Mrs. Vidya Sapre

New York

Qualification - शिक्षणाने वैज्ञानिक

Mobirise

About -

विद्या हर्डीकर सप्रे

 • शिक्षणाने वैज्ञानिक,
 • व्यवसायाने संगणकतज्ञ,
 • वृत्तीने साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ती.

साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडते, तशी समाजात सामाजिक कार्याबद्दल जागृती निर्माण करण्याची ताकद साहित्यात असते. या ताकदीचा उपयोग आपल्या लेखनात जाणीवपूर्वक करण्याचे प्रयत्न.त्यामुळे साहित्य प्रवास , सामाजिक कार्य आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचे कार्य हे एकमेकात गुंफलेले आहे.  वेगळा विचार करता येत नाही.

साहित्यिक या नात्याने

१.महाराष्ट्रातीलआणि अमेरिकेतील अनेक नियतकालिकात विपुल लेखन. १९१६ मध्ये लोकसत्ताच्या देशोदेशी या सदरात एक वर्ष लेखमालिका.अनेक इ-नियतकालिकात लेखन.

२.बृहन्महाराष्ट्र वृत्तावर संपादक, सहसंपादक, सल्लागार या नात्यानी काम.

३.ईग्रंथाली दिवाळी २०१२; बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रसिद्ध झालेल्या विशेषांकाचे संपादन.

४. आत्तापर्यंत  पुढील सातपुस्तके प्रकाशित. :

स्वलिखित:  “संवादने”,  मांजरफन, अमेरिकन मराठी: जन मन अधिवेशन

संपादित: निरंतर, ल्याले ऐलपैल

               अनुवादित: अमर्त्य भारत.( मूळ लेखक : आमिश त्रिपाठी)

सामाजिक कार्यकर्त्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण ( टाटा एन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पाठ्यक्रमासाठी पाठ्यपुस्तक)

 

५. २०१०च्या  पुण्यातील मराठी साहित्य संमेलनात ‘अनिवासी मराठी साहित्य’ या परिसंवादाचे संयोजन व  उत्तर अमेरिकेतील मराठी लेखकांची प्रतिनिधी या नात्याने सहभाग.

६. महाराष्ट्र फौन्डेशनचे निधिसंकलन कार्यक्रम,  मराठी मंडळे आणि  अधिवेशनातील  काही कार्यक्रमांच्या संहिता लेखनाचे काम.

७.स्थानिक लेखकांसाठी ‘शब्दांच्यां संध्याकाळी’ ‘अभिव्यक्ती’ असे उपक्रम सुरु करण्यात पुढाकार.

२००१च्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या  अधिवेशनात ‘साहित्यक्षेत्रातला सन्मान’.

 

सामाजिक कार्यकर्ती या नात्याने 

१.महाराष्ट्र फ़ौन्डेशन, एकल विद्यालय अशा अमेरिकेतील भारतीय संस्थांची पदाधिकारी म्हणून काम आणि महाराष्ट्रातील अनेक समाज सेवा संस्थांबरोबर काम. महाराष्ट्रातील सेवाकार्यांचा परिचय अमेरिकेतील मराठी समाजाला करून देण्यासाठी “एकता“ या नियतकालिकात  १० वर्षे लेखमाला लिहिली. अमेरिकेतील काही अमेरिकन स्वयंसेवी संस्थात स्वयंसेवक म्हणून काम.

२. “खेडे दत्तक योजना”( Social Reform of a village) या योजनेची संकल्पना अमेरिकेतील मराठी मंडळाना समाजावून देऊन महाराष्ट्रातील चार खेड्यांच्या विकासाचे स्वप्न साकार ( नियोजन ते उपयोजन) करण्यात सक्रीय सहभाग. त्यासाठी विविध   निधिसंकलन कार्यक्रमांचे आयोजन.  या सर्व खेड्यांच्या कामाचा गेली २५ वर्षे मागोवा.

३. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून काम. पंधरा अधिवेशनात विविध नात्यानी स्वयंसेवक म्हणून सहभाग. उत्तर रंग उपक्रमात सक्रीय सहभाग.

४. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या  अनेक अधिवेशनात महाराष्टातील सेवाकार्याबाद्द्ल परिसंवाद आयोजित करण्यासाठी परिश्रम.

१९९९च्या सान होजे येथील बृहन महाराष्ट्र अधिवेशनात समाजसेवेबद्दल सन्मान

*************************************************************************************

पुस्तकान्विषयी तपशील 

संवाद्ने :

स्वभावजन्य उर्मी, कौशल्ये आणि कर्तव्ये यांची सांगड घालत; एक संवेदनाशीलतेचा पंख आणि दुसरा सामाजिक जाणिवेचा घेऊन केलेला सामाजिक कार्याचा प्रवास आणि त्याबद्दल अमेरिकेतील मराठी लोकांशी केलेला संवादसंग्रह.   ( ग्रंथाली प्रकाशन, मुंबई)

अमेरिकन मराठी जन मन अधिवेशन:

अमेरिकेतील मराठी समाजाची गेल्या ५० वर्षाची वाटचाल (ग्रंथाली,मुंबई)

मांजरफन:

ग्लोबलायझेशनच्या रेट्याखाली तणावयुक्त जीवन जागणाऱ्या मराठी माणसाचे निव्वळ मनोरंजन करणारे ललित लेखनाचे पुस्तक !(ग्रंथाली, मुंबई)

अमर्त्य भारत:

भारतातील आजच्या तरूण वाचकात विशेष लोकप्रिय असलेले; शिवा ट्रीयालोजी गाजलेल्या तीन    पुस्तकांचे लेखक आमिश त्रिपाठी यांच्या  Immortal India या लेख संग्रहाचा मराठी अनुवाद

निरंतर , ल्याले एल पैल :

उत्तर अमेरिकेतील मराठी लेखकांना एकत्र करून कथा संग्रह व लेखसंग्रह संपादन.

**********************************************************************************

सामाजिक कार्याचे तपशील :

 • महाराष्ट्र फौंडेशन:

१९८१पासून संस्थापक यशवंत आणि विजया कानिटकर यांच्याबरोबर काम.

कार्यकारिणीवर अनेक वर्षे काम : सदस्य, उपाध्यक्ष, वितरण समिती अध्यक्ष.

निधिसंकलन उत्सव: न्यू जर्सी, वॉशिंग्टन डी. सी., शिकागो, लॉस एन्जेलिस, बे एरिया.

नियोजन ते  सांगता आणि मागोवा ( फॉलो अप )

वार्तापत्र, वार्षिक अहवाल, विशेष वार्तापत्रे, जाहिराती : संपादन, लेखन ई.

विद्यार्थी अनुगृहीत योजना: ( sponsor a child) : संकल्पना, कार्यवाही, मागोवा, आणि अशा मुलाना प्रत्यक्ष दरवर्षी भेटून प्रगतीची पहाणी.

 • .“खेडे दत्तक योजना”( Social Reform of a village) प्रत्येक मराठी मंडळाने एक खेडे दत्तक घेऊन त्याच्या विकसनाची जबाबदारी घ्यावी अशी संकल्पना: ही संकल्पना अमेरिकेतील मराठी मंडळाना समाजावून देऊन महाराष्ट्रातील चार खेड्यांच्या विकासाचे स्वप्न साकार ( नियोजन ते उपयोजन) करण्यात सक्रीय सहभाग. त्यासाठी विविध निधिसंकलन कार्यक्रमांचे आयोजन.  या सर्व खेड्यांच्या कामाचा गेली 25 ते 30  वर्षे मागोवा. ( सणसवाडी, हराळी, मांगवली, चिखलगाव)
 1. सणसवाडी : प्रायोजक : न्यूजर्सी मराठी समाज

कार्यवाहक: ज्ञान प्रबोधिनी ( पुणे)

 1. चिखलगाव ( दापोली) : प्रायोजक: बे अरियातील मराठी समाज

कार्यवाहक: लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (दापोली)

 1. मांगवली ( सिंधुदुर्ग तालुका) : प्रायोजक: लॉस एञ्जेलिस मराठी समाज

कार्यवाहक: कोकण विद्या प्रसारक मंडळ

4 हराळी: ( ता. उमरगा, मराठवाडा) प्रायोजक: लॉस एञ्जेलिस मराठी समाज

कार्यवाहक: ज्ञान प्रबोधिनी, सोलापूर व हराळी

 • महाराष्ट्रातील ३०० संस्थांची माहिती : संकलन, आभ्यास, प्रकपासाठी निवडी.
 • महाराष्टातील संस्थाना भेटी: ५० चे वर.
 • महाराष्ट्रात ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे चालविल्या जाणार्‍या महिला बचतगट मोहिमेस मदत.
 • १९९३ खिलारी भूकंप: निधिसंकलन, वितरण, मागोवा. हरळी गावाचे पुनर्वसनात सहकार्य व त्यां गावाचा गेली 27 वर्षे मागोवा. त्यावर अनेक लेख लिहून देणगीदारांना आवाहन. हरळीशाळेच्या ग्रंथालयाचे संगणकीकरण करण्यास मदत.
 • कोकण विद्या प्रसारक मंडळ,  लोकमान्य पब्लिक charitable trust ई. संस्थांच्या सल्लागार समितीवर काम.
 • एकल विद्यालय: लॉस एन्जेलिस भागात १ वर्ष कार्यकारिणीवर काम, व अनेक वर्षे स्वयंसेवक.
 • प्रथम : लॉस एन्जेलिस भागात स्वयंसेवक. प्रथमच्या सहकार्याने हराळी गावाच्या विद्यार्थी व शिक्षकासाठी प्रकल्प.
 • बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सल्लागार समितीची अध्यक्ष आणि विविध अधिवेशनात विविध नात्यानी स्वयंसेवक म्हणून सहभाग.
 • ७. उत्तर रंग:उत्तर अमेरिकेतील भारतीय आणि विशेषत: मराठी लोकांच्या उत्तर आयुष्याचा विचार करण्यासाठी असलेल्या अशोक सप्रे यांनी संस्थापित आणि सुस्थापित केलेल्या उत्तररंग या उपक्रमात साहायय आणि बृहन्महाराष्ट्रवृत्तात उत्तर रंग हे सादर चालविण्यात पुढाकार.

******************************************************************************

बृहन महाराष्ट्र मंडळाशी  सम्बंधित कार्याचे तपशील :

 • वृत्त: ( १९८५ ते २०१५)
 • संपादक , सहसंपादक, सल्लागार, लेखक, स्वयंसेवक. सदर संयोजन,( उत्तर रंग, या नोकरीत मला काय आवडते, ऐसी अक्षरे रसिके, व्यक्तिविशेष, मराठी लेखकाबद्द्ल सादर इ.) अशा नात्यांनी संबंध.
 • कार्यकारिणी : १९८५ ते १९९१ : सदस्य ( वृत्त संपादक या नात्याने )

२००७ ते २०११: सल्लागार समिती/ अध्यक्ष.

समितीसाठी process documents तयार केली. घटना दुरुस्ती समितीचे काम, पुरस्कार समितीवर काम

२००९ : निवडणूक अधिकारी

‘मराठी तितुका मेळवावा’ हे बोधवाक्य ठरवण्यात पुढाकार.

 • अधिवेशने: संयोजन सहभाग, स्मरणिका संपादन, अधिवेशन सल्लागार, कायर्क्रम सूत्रधार, सांगता समारंभ संहिता लेखन, अधिवेशन घोष वाक्य निवड समितीवर काम, स्वयंसेवी संस्थांसाठी प्रदर्शन दालन ( booth sponsor), ‘तेजोमयी’ : समाजावर कार्तुव्त्वाचा ठसा उमटवलेल्या स्त्रियांवर प्रदर्शन, चर्च सत्रे संयोजन ( विशेषत: महाराष्टातील समाज कार्याबद्दल).

अधिवेशनात नव्या प्रथा : पुस्तक प्रकाशन ( 2011) आणि उत्तररंग परिषद (2015)

चर्चा सत्रे संयोजन व सहभाग: उदा: रचनात्मक कार्ये, एकता साहित्यिक मेळावा, कविसंमेलने, सामाजिक प्रश्न,  उत्तर रंग इ.

 • मैत्र: २००० : मैत्र अधिवेशनात ‘तेजोमयी’ प्रदर्शन, व चर्चासत्र.

 

 • उपक्रम:
 • मराठी शाळा: स्थानिक शाळात मदत. सक्रीय सहभाग.
 • उत्तर रंग: ही संकल्पना व चळवळ बृ म मंडळाचा भाग बनवण्यात पुढाकार.

अनेक ठिकाणी एक ते २ दिवसाच्या परिषदा करण्यात अशोक सप्रे याना मदत.

२०१३: उत्तर रंग नामदर्शिकेत अशोक सप्रे आणि मोहन रानडे याना साहाय्य

२००४ ते आज: बृहन्महाराष्ट्र वृत्तात उत्तर रंग हे सादर चालवण्यात सहभाग.

२०१५: अधिवेशनास जोडून उत्तर रंग ही स्वतंत्र एक दिवसाची परिषद घडवून आणण्यात पुढाकार .

 • मार्ग:लॉस एन्जेलिस मराठी मंडळात हा हेल्प लाइन उपक्रम सुरु केला व अन्य मंडळांनी करावा म्हणून प्रयत्न.
 • खेडे दत्तक योजना: एक मराठी मंडळ एक गाव !

 

 

झेपावणाऱ्या पंखाना क्षितिजे नसतात

——विद्या हर्डीकर सप्रे, कॅलिफोर्निया

“यंदा बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन आहे” … अशी प्रस्तावना जेवणाच्या टेबलावर केली जाते, आणि गरम गरम जेवण गार होईपर्यंत गरमागरम चर्चा  चालू रहाते.’मराठी भाषेतील पहिला शब्द’ याबद्दल ‘गुगल’चं काही का मत असेना; मुळात मराठी भाषा निर्माण झाली तेव्हाचा पहिला शब्द होता चर्चा आणि दुसरा होता वाद!  ( संवाद , परिसंवाद हे शब्द संस्कृत बरंका !) या वादात मराठी विषयक अनेक विषय येतात पण प्रारंभ होतो, “ आपण यंदा अधिवेशनाला जायचे का नाही?” या मुद्द्याने.

“जाऊ या ना. कार्यक्रम काय मस्त असतात !”

“ काहीतरीच काय, मागच्या अधिवेशनात तो शेवटचा कार्यक्रम किती भिकार होता!”

“गाणी किती सुंदर म्हणतात!”

“ मग त्यासाठी तिथे कशाला जायला पाहिजे ? इथं घरात “अलेक्सा अमेझॉन” ला सांगितलं की तीसुद्धा लता मंगेशकर ची गाणी म्हणते!”

“ तिन्ही त्रिकाळ मस्त जेवण चापायला मिळतं !”

“ मस्त काय, त्या तमक्या अधिवेशनात पुरणपोळीवर तूप सुध्दा नाही मिळालं !”

“ आपली मित्र मंडळी नाही का भेटत ?”

“ भेटतात कसली , नुसतीच  धावताना दिसतात!”

“ पण पारदर्शक साडीतल्या विमुक्त पाठ्दर्शक मैत्रिणी किती छान दिसतात!”…. इ. इ. इ.

अशी वादावादी वाढतच जाते. कारण एक शिवाजीमहाराज सोडले तर मराठी माणसात कोणाबद्दल आणि कशाबद्दल एकवाक्यता नसते म्हणे. ( नवराबायकोच्या बहुमतात पास होणारे दुसरे कदाचित ‘पु.ल.’ असावेत असा अंदाज आहे.)

या सर्वावर चर्चा करताना लक्षात आले की  अमेरिकेतल्या मराठी माणसांचा गेल्या ५० वर्षाचा आढावा घेऊन कोणी त्यावर पुस्तक लिहिलेले नाही.  तसे पुस्तक लिहिणे हे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही आवश्यक आहे.  म्हणून मी आणि माझ्या नवऱ्याने  (अशोक सप्रे) एकमताने अमेरिकन मराठी: जन , मन, अधिवेशन’ हे पुस्तकच लिहिलं आणि ते अभ्यासू ,जिज्ञासू आणि अज्ञासू ( म्हणजे अभ्यासू ,जिज्ञासू असा आव आणणारे) अशा सर्व मराठी लोकाना अर्पण कराव, असं ठरवल.(  हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने २०१५च्या मराठी अधिवेशनात प्रकाशित केले,याची सर्वसूनी नोंद घ्यावी.)

या पुस्तकाचीअर्पणपत्रिका लिहिताना जाणवल की गेल्या ५० वर्षात उत्तर अमेरिकेत झेप घेऊन आलेल्या हजारो  मराठी स्वयंसेवकानी आपले धन, लाखो क्षण नव्हे तर लाखो तास देऊनआपले मराठीपण जपण्यासाठी ‘तन मन धन पूर्वक’ केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.  प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे!या सर्वानी  उत्तर अमेरिकेत मराठी संस्कृतीची सेवा केली. विविध प्रकारे जोपासना केली आणि अजूनही करत आहेत. त्यानी उत्तर  अमेरिकेतील मराठी संस्कृतीत तर  योगदान केलेच. पण महाराष्ट्रासाठी आणि अमेरिकेसाठीही ही केले. त्या सर्व  मराठी जनाना मन:पूर्वक प्रणाम केला पाहिजे.

त्या पन्नास वर्षान्ब्द्द्ल काय सांगता येईल ? 

गेल्या पन्नास  वर्षात अमेरिकेतील मराठी सामाजिक प्रवाहाला अनेक वळणे लागली. विसाव्या शतकाच्या सत्तरीत महाराष्ट्रातल्या गावागावातले चुळबुळते सरदेसाई‘पर’देसाई होऊन अमेरिकेतल्या गावोगावी येऊ लागले होते!  स्थलांतरितांची नव्या भूमीत रुजण्याची कहाणी तेव्हा सुरु झाली. एकीकडे झेपेच्या कवेत घेणारं आकाश आणि त्या आकाशात पाय टेकताना जमीन नसण्याची भावना असा संघर्षही त्या कहाणीत असतो. आपली वाट आपणच निर्माण करण्याची ती लढत असते.यशस्वी जगण्यासाठी लागणारा अमेरिकन यंत्रणेचा सामाजिक टेकू होता पण त्याबरोबर मराठीपणा चा मानसिक टेकू हवा होतां ! त्यासाठी सुरु झाली मराठी मंडळे….

त्यानंतर मराठी समाजाला नवे प्रवाह येऊन मिळाले. अमेरिकेतही बदल झाले. आता तर आपण सारे विश्वात्मकतेच्या लाटेवर स्वार झालो आहोत. गेल्या  पन्नास वर्षातील बदलती अमेरिका अनुभवताना आम्ही मराठी समाजाचे अनेक बदलते प्रवाह जवळून पाहिले. अनेकवेळा त्यात झेप घेतली. खळाळतेचा थरार अनुभवला. काही मराठी मंडळांचे जन्मसोहोळे, बृहन्महाराष्ट्र मंडळाचा उगम, मराठी अधिवेशने आणि वृत्त, उत्तर रंग सारखे  अन्य उपक्रम; या सर्वात आमचा प्रथमपासून सक्रीय सहभाग आहे. तसेच काही उपक्रमांचे आम्ही जवळचे साक्षीदार आहोत. आपलं, यश आणि आपल्या आकांक्षा बरोबरीने अनुभवाव्या…कलाकृतींचा आनंद एकत्रित पणे घ्यावा.. सुचलेल्या कल्पना एकमेकांना सांगाव्यात..आपल्या अडचणी एकमेकांशी बोलाव्यात..काही उपाय संघटितपणे शोधावेत.. नव्या मैत्राचे सूर जुळावेत..  या साठी आहे हा  बृहन्महाराष्ट्र मंडळाचा मंच !आजच्या परिभाषेत “नेट्वर्किंग हब”! कल्पना जागरण (Brain storming),माहिती प्रसारण (Reach out),सेवा मदत (Help),प्रेरणा (Motivation),नव्या कल्पनांचे स्वागत वेगळ्या वाटेने जाणाऱ्या लोकांचे आणि संस्थांचे स्वागत या सर्वांसाठी असलेले हे व्यासपीठ !!

यामुळे महाराष्ट्राबाहेरचा मराठी समाज म्हणून आपल्याला एक आत्मस्वरूप ( आयडेण्टीटी), आत्मभान आणि अस्मिता मिळाली. त्यातून अनुबंध ( नेटवर्क) निर्माण झाले.

आपली स्वप्ने साकार करण्याचं सामर्थ्य या अनुबंधात आहे हे उमजलेल्या काही  मराठी लोकांनी

 • महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातआणि मराठी भाषा, साहित्यात आपले योगदान ( काँत्रिब्यूशन्) केले.
 • काही मराठी लोकांनी अमेरिकेतील मराठी समाजासाठी श्रम घेतले आणि घेत आहेत.
 • तर काही अमेरिकन समाजासाठी आपले योगदान करत आहेत.

या तीन चाकी रथाची गती आपल्याला व्यक्ती आणि समाज म्हणून प्रगतीपथावर नेत आहे.

 

१९७०च्या सुमाराला आलेल्या मराठी लोकांनी पायवाट निर्माण केली, तसे त्यानंतरच्या आलेल्या पिढ्यांचे मराठी त्यावाटेवरून पुढे जात महामार्ग निर्माण करीत आहेत. आणि करतील अशी अपेक्षा आहे. मराठी शाळा, युवकांचे उपक्रम, मराठी अधिवेशने, मराठी महाजाल वाणी म्हणजे इंटर नेट रेडीयो, मराठी नियतकालिके, मराठी पुस्तके, मराठी संगीत आणि नाट्यविषयक उपक्रम, मराठी व्यावसायिकांचे मंच, आणि समाजसेवा संस्था अशी अनेक क्षेत्रे आहेत. .

आता मराठी मंडळांचे आणि बृहन्महाराष्ट्रमन्डळाचे जन्म सोहाळे साजरे करणारी आमची पिढी आयुष्याच्या  उत्तरार्धाचा विचार करू लागली आहे; नव्हे उंबरठ्यावर येऊन उभी आहे. त्या पाठोपाठ आलेले आता पन्नाशीत आणि  चाळीशीतील असलेले  मराठी ..( कदाचित त्यातच आमच्या मुलांची दुसरी पिढीही असेल.) आमच्या वाटचालीकडे पहात आहेत.   स्थलांतर करून अमेरिकेत आलेल्या सर्वच देशातल्या लोकाना  आयुष्याच्या पूर्वकाळाचा तसा  उत्तर काळाचाही वेगळा विचार करावा लागतो तेव्हा आपण आपले  उत्तर आयुष्य सुखा समाधानात कसे  घालवू शकू याचे  मार्गदर्शनासाठी लागणाऱ्या; आचार विचारांची व माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी उभा केलेला रंगमंच म्हणजे उत्तररंग आणि उत्तर रंग परिषदां.आयुष्याच्या उत्तर रंगात आपला वेळ आणि श्रम देऊन अमेरिकेत आणि भारतात कोणकोणते सामाजिक उपक्रम करता येतील याचा विचारही अशा परिषदेत केला जात असतो…  हा आता पर्यंतचा आपला प्रवास.

सांगा गर्वाने | मिळवले श्रमाने ||

मिरवा सन्माने | नांदा आनंदाने || ….. असा.

आता पुढील  झेप कोणती असेल ?  बाबा आमटे यांच्या या कवितेतील पुढील ओळीत सांगितलेली……

 

झेपावणाऱ्या पंखाना क्षितिजे नसतात

त्याना फक्त झेपेच्या कवेत घेणारे आकाश असते

सृजनशील साहसाना सीमा नसतात

त्याना फक्त मातीच्या स्पर्शाची अट असते !

.  मातीला ,संस्कृतीलां स्पर्श करीत घेतलेली  प्रगतीची झेप! कारणमातीचा  स्पर्शधागा  तुटला तर   खुल्या आकाशातलं मुक्त विहरणं  हे भरकटू शकतं.

 • म्हणूनच आपली मूळ अस्मिता न विसरता तिच्याबद्दल कमीपणा, न्यूनगंड न बाळगता  ती व्यापक कशी करावी, आपल्या मुलांच्या पिढीला कशी द्यावी  याचा विचार आणि कृती आपल्या सृजनशील साह्सांत कशी संक्रमित करावी हे आपल्यापुढील आव्हान आणि  आवाहन आहे
 • आपल्या मराठीपणाचा रास्त अभिमान आपल्या भारतीय ‘स्व’मध्ये विस्तारित करण्याचं आणखी एक आव्हान आणि आवाहन आहे. आपण अन्य भारतीयांशी हस्तांदोलन करून काही उपक्रम करू शकू का? या प्रश्नांच्या उत्तरात त्यांची दिशा आहे.
 • त्यापलीकडे आहे आपली आणखी विस्तारलेली अमेरिकन अस्मिता! आम्ही भारतीय अमेरिकन म्हणजे कोण? आम्हाला अमेरिकेत पाठवण्याची आमच्या देशानं सक्ती केली नव्हती. त्यामुळेविस्थापित नव्हे. आम्हाला कोणी गुलाम म्हणून बांधून नाही आणलं म्हणूनसन्मानित, जगातील दोन मोठय़ा प्रजासत्ताक देशांत राहण्याचं भाग्य लाभलेले, दोन्ही देशांत सुस्थापित असे आम्ही भारतीय अमेरिकन! अकरा सप्टेंबरला भुईसपाटहोणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरने घायाळ होणारे आणि मुंबईत ताज हॉटेलवरीलदहशतवाद्यांचा हल्ला पाहताना झोप उडालेले. दोन्ही देशांतील अशा अनेक अभागीघटनांचे खोल पडसाद अनुभवणारे आम्ही भारतीय अमेरिकन आहोत. आपण अमेरिकन संस्कृतीशी समरस होण्यासाठी आणखी कसे  प्रयत्न करणार आहोत ?  असे अनेक प्रश्न ही झेप घेताना स्वत:ला विचारले पाहिजेत असे वाटते.

या सर्वाची सांगड कशी घालता येईल ?या पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी  विचारविनिमय करताना   श्री. अविनाश धर्माधिकारी  यांनी पुष्कळ काही सुचवले आणि आम्हालाही  काही सुचले. उदाहरणार्थ :

 • महाराष्ट्रातल्या शिक्षणसंस्थांशी जगभराच्या मराठी माणसाला जोडण्याचा उपक्रम:

जगभर गेलेला मराठी माणूस तिथल्या शिक्षणसंस्थांतील उत्तमोत्तम गोष्टी भारतात कशा नेता येतील याचा विचार करून काही  उपक्रम करू शकेल. . आपल्या जीवनानुभवातून   विस्तारलेली आपली ताकद  महाराष्ट्रातील , भारतातील मनांच्या  मशागतीला वापरता येईल.

 • .तंत्रज्ञान आणि आर्थिक गुंतवणूक: मराठी माणसांनी जगभर आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञता मिळवली आहे. त्याचा  उपयोग भारताला करून देता येईल. आपल्याकडे असलेल्या  आर्थिक भांडवलातून भारताच्या विकासाला, रोजगारनिर्मितीला हातभार लागू शकेल. लहान सहान  प्रमाणात  असे प्रकल्प होतात. पण आपल्यात मोठी झेप घेण्याची कुवत आहे.

अमेरिकन मराठी जन मन अधिवेशन या आमच्या ऐतहासिक पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना श्री.अविनाश धर्माधिकारी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे या भविष्यातील झेपेच्या संदर्भात मांडले  आहेत.

त्यांच्या मते, आज जगभर मराठी आहेत तरीही महाराष्ट्रात (भारतात) काही पॉझिटिव्ह – विधायक गोष्टींना चालना देण्याएवढा ‘क्रिटिकल मास’ आता अमेरिकेतल्या मराठी माणसांपाशी तयार झालेला आहे.

चांगले बदल घडवण्यासाठी, त्याकरता जाणीव-जागृती आणि चांगल्या अर्थानं ‘दबाव’ आणण्यासाठी या ‘क्रिटिकल मास’चा उपयोग होऊ शकतो, व्हायला हवा. त्याच वेळी भारताची बाजू अमेरिकेत आणि जगासमोर सुद्धा मांडायला, अमेरिकेच्या कायदेकानूंच्या चौकटीत भारतासाठी ‘लॉबिंग’ करायला या ‘क्रिटिकल मास’चा उपयोग होऊ शकतो – झाला पाहिजे. मला वाटतं की जगभरच्या – अमेरिकेतल्या मराठी (मूळ भारतीय) माणसाच्या कामाची पुढची दिशा अशी ‘दुहेरी – दुधारी’ असायला हवी – भारतातल्या चांगल्या बदलांसाठीचा एक जागतिक दबावगट आणि भारताची बाजू जगासमोर – अमेरिकेसमोर योग्य पद्धतीनं मांडणारा संघटित समूह.

याबरोबरच श्री. धर्माधिकारी आणखी स्वप्न आपल्यासमोर मांडले आहे. ते म्हणतात, की    “बदलत्या जागतिक परिस्थितीच्या दबावामुळे एखाद्या देशात घडणार्‍या बदलांना पत्रकार थॉमस फ्रीडमाननं ‘ग्लोब्युलेशन’ –(Globulation )- Revolution under global pressure – असा शब्द वापरलाय. भारतात असं ‘ग्लोब्युलेशन’ घडवण्यात अनिवासी भारतीयांचा (मराठी माणसाचा) वाटा, सहभाग, असू शकतो – असला पाहिजे.

BMM अधिवेशनं हा आधार धरून अशा उपक्रमांच्या योजना आकाराला याव्यात अशी एक अपेक्षा मी नोंदवून ठेवतो.”

जगात कुठेही राहिलो तरी. आता जगात कुठेही असलो तरी मराठी-महाराष्ट्र-भारताच्या भल्यासाठी काम करता येतं ही भूमिका असेल तर असे अनेक प्रकल्प, उपक्रम व्यक्ती आणि मराठी समाजाच्या पातळीवर सुचतील , करता येतील.  संमेलनातील साबुदाणा खिचडी आणि पुरणपोळ्या यांच्या पलीकडे जाऊन  आपली मराठी समाज म्हणून एकवटलेली ताकद आजमावून पहाणे आणि  तनमन धन पूर्वक ध्यास गतीचा घेऊन श्रमाचा मंत्र म्हणत साहसाला सिध्द व्हावे.

सृजनशील साह्साना सीमा नसतात, त्यांना मातीच्या स्पर्शाची अट असते तशी आपले पंख पसरवण्याची इच्छा आणि अटही लागते !                                                    विद्या हर्डीकर सप्रे , कॅलिफोर्निया