NewsBharati Bapat PhD scientist Emeritus

पारल्यातली स्कॉलर ते कॅनडातली सायंटिस्ट एमेरिटस्     

पारले टिळक विद्यालयातली वर्ष १९७२ मधे शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेली चि भारती आपटे, विवाहपश्चात डॉ भारती बापट, ही आजच्या आपल्या लेखाची नायिका अगदी अशीच पारलेकर आहे. तिची दीर्घ आणि वैविध्यपूर्ण शैक्षणिक कारकीर्द – विवाहानंतर कॅनडात  स्थायीक झाल्यानंतर, तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडलेल्या तिची, ऊर्जा आणि कामाप्रति उत्सुकता, नव्या समाजाशी आणि नव्या सहकाऱ्यांशी जुळवून घेऊन त्यातलीच एक होण्याचे तिचे अथक प्रयत्न आणि तिच्या क्षेत्रांत कॅनडा या देशाचे प्रतिनिधित्व करतांना तिला मिळालेली कीर्ती.. ..हे सगळंच यश कौतुकास्पद आहे, अचंबित करणारं आहे.

 

भारतीचे वडील श्री विश्वनाथ आपटे आणि आई सौ प्रभावती

जगप्रसिद्ध पारले जी ही बिस्किटे अगदी सुरुवातीला जिथे बनत असंत त्या परिसराला आजही, बिस्किट फॅक्टरी अशा नावाने आम्ही पारलेकर ओळखतो. अगदी अलिकडेपर्यंत, या बिस्किट फॅक्टरीत आठवड्यातील दोन किंवा तीन दिवस, पारले जी ही बिस्किटे बनवली जात असंत. त्या दिवशी या बिस्किटांचा हवाहवासा स्वाद आणि सुगंध, आम्हा पारलेकरांचे पर्यावरण भारून टाकत असे. नव्याने पारल्यात आलेल्या पाहुण्यानां हा बिस्किटांचा स्वाद आणि सुगंध, अनोखा अनुभव असे. याच पारले जी बिस्किट फॅक्टरीच्या अगदी शेजारी असलेल्या विष्णुप्रसाद सोसायटीत डॉ भारतीचे कुटुंब रहात असे. पारले जी हे उदाहरण अशासाठी की डॉ भारतीच्या जेनेटिक म्युटेशन आणि कॅन्सर संशोधन क्षेत्रातिल कार्याचा आणि यशाचा परिचय असाच पाची खंडात दरवळतो आहे. 

मागे पुढे मोठे अंगण असलेल्या या निवासी संकुलातील चार इमारतीत, खूप साऱ्या समवयस्क सवंगड्यासोबत लगोरी – लपंडाव खेळताना सहजिवनाचा अनुभव घेत घेत, भारतीचे भावविश्व संपन्न झाले होते. चवथी इयत्ता – सातवी इयत्ता आणि शालांत परीक्षेनंतर नॅशनल स्कॉलरशिप अशा सर्व शिष्यवृत्त्या मिळवणारी, शाळेत एक हुशार विद्यार्थिनी म्हणून शिक्षकांची लाडकी असलेली भारती, सबनीस सर आणि सहस्रबुद्धे सर या दोन शिक्षकांच्या आठवणी सांगताना परत भूतकाळात रमते. शाळेतील त्या आठवणी सांगताना तिने अनुभवलेली शिक्षकांच्या मनातील विद्यार्थ्यांप्रति असलेली आपुलकी – जिव्हाळा आणि तिचे हरखून जाणे असा कुमार – किशोर वयांतील विलेपारल्यातील वास्तव्यतील तिचा भवताल असा समृद्ध होता.

एक मोठी बहीण आणि दोन भाऊ या भावंडातली भारती सर्वात लहान. आईच्या प्रोत्साहनामुळे पहिल्या इयत्तेतच तिची कथक नृत्याची तालिम सुरू झाली होती. शाळेतल्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये भारतीचा नियमित सहभाग असे. वर्ष १९७२ मधे शालांत परीक्षा (त्यावेळची अकरावी) उत्तीर्ण झाल्यानंतर भारती कॉलेजमधे दाखल झाली. मायक्रोबायालॉजि विषय घेऊन ती बी एससी पदवी परीक्षा, वर्ष १९७६ मध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली. आता पुढील शिक्षणाची तयारी आणि त्यासाठी विचारमंथन सुरू झाले.

डॉ जगन्नाथ गोविंद काणे हे विद्वान गृहस्थ त्याकाळात UDCT या नामवंत शिक्षण संस्थेत प्राध्यापक आणि डायरेक्टर होते. परदेशी विद्यापीठात शिकून Ph D प्राप्त झालेले डॉ काणे हे आपल्या भारतीचे मामा. मामांच्या ज्ञानसाधनेचा – प्रखर बुद्धिमत्तेचा – विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि देवमाणूस या त्यांच्या प्रतिमेचा, सौम्य व्यक्तिमत्वाचा आणि शास्त्रज्ञ म्हणून परिचित असले तरी त्यांच्या साध्या दैनंदिन जीवनशैलीचा प्रभाव,  अगदी बालवयातच भारतीला आदर्शवत वाटत होता. डॉ काणे यांना आणि भारतीच्या वडिलांना वाचनाची खूप आवड होती. या दोघांच्या प्रभावाने तिला वाचनाची गोडी लागली आणि पारल्यातील लोकमान्य सेवा संघाच्या श्री वा फाटक ग्रंथसंग्रहलयाने तिची वाचन संस्कृति, संपन्न आणि समृद्ध केली. या ग्रंथसंग्रहालयाच्या बालवयातील आठवणीने, चाळीस – पंचेचाळीस वर्षानंतर सुद्धा डॉ भारती प्रसन्न होते. विलेपारल्यातील सांस्कृतिक जीवन, वाङमय – साहित्य – संगीत – नाटके – व्याख्याने अशा नियमित होणाऱ्या कार्यक्रमांनी समृद्ध होते. भारती म्हणते .... “किशोर – कुमार– तरुण वयातिल माझ्या या अनुभवांनी माझे व्यक्तिमत्व घडवले आहे. विलेपारल्यात झालेली अशी सांस्कृतिक जडण – घडण, हा जणू माझा नकळत मिळालेला निसर्गदत्त वारसाच असे म्हणायला हवे”.

UDCT चे (आताचे ICT: Institute of Chemical Technology) वरिष्ठ संचालक असलेले डॉ काणे, Soap and Oil या विषयातिल शास्त्रज्ञ होते आणि त्या काळांत उद्योग जगतातील अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय उद्योगांचे सल्लागार होते. आजही डॉ काणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिक व्याख्यानाचे आयोजन UDCT तर्फे केले जाते. मामांच्या व्यक्तिमत्वाचा जसा प्रभाव होता तसाच त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा आणि शिक्षणक्षेत्रातील कार्याचाही मोठा प्रभाव भारतीवर होताच. मामांसारखंच आपल्याला खूप शिकायचं आहे आणि जगभर प्रवास करायचा आहे अशी दोन स्वप्न भारती पहात होती. पुढील शिक्षणासाठी भारतीने UDCT मधे प्रवेश घेतला. प्रोफेसर डी व्ही ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली Foods and Fermentation Technology या विषयात ती  Masters Degree परीक्षा उत्तीर्ण झाली. UDCTमधील शिक्षणाच्या काळांत, सामाजिक विषयांवर जाणीव – जागृती करणाऱ्या मित्र – मैत्रिणींच्या संस्थेमधे पथनाट्य सादर करण्यात तिचा विशेष सहभाग असे. नंतरच्या काळातील परदेशातील दीर्घ वास्तव्यात, भारतीच्या या जाणिवा आणि हे अनुभव यामुळे, समाजाप्रति तिचा दृष्टिकोन संवेदनशील राहिला. घरातून स्वावलंबनाचे धडे मिळाल्यामुळे या काळांत भारतीने सायन्स आणि मॅथ्स या विषयात शालेय विद्यार्थ्यांसाठी शिकवण्याही घेतल्या. कॅनडातील वास्तव्यात काही काळ शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी एकटे रहावे लागले होते. त्यावेळी या स्वावलंबनाचा खूप फायदा झाला. 

एम् एस्सी पर्यंतचा शिक्षणाचा प्रवास, सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच Microbiology या मुख्य विषयांत झाला होता. यांच पायावर आता तिला पुढचे शिक्षण घ्यायचे होते. Reproductive Biology चा PhD चा अभ्यास करण्यासाठी तिने Institute for Research and Reproduction, या मुंबई विद्यापीठाच्या शाखेत प्रवेश घेतला. Post implantation changes using animal models हा भारतीच्या Ph D च्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. Ph D चा अभ्यास सुरू असतानाच, वर्ष सप्टेंबर १९८२ मधे श्री विनीत बापट यांच्याशी भारतीचा विवाह झाला आणि व्हीसाचे उपचार पूर्ण झाल्यावर, वर्ष १९८३ च्या एप्रिल महिन्यात भारती कॅनडाला आपल्या सासरी गेली. प्रॅक्टिकल पूर्ण झाली असली तरी कॅनडामध्ये गेल्यानंतरही तिचा थिसिस अपूर्ण होता.  तिचे गाईड डॉ ए आर शेठ यांच्या सल्यानुसार, कॅनडात आल्यावर तिने तिचा थिसिस पूर्ण केला. वर्ष १९८४ – ८५ मधे भारतात आली असताना तिची व्हायवा मुलाखत झाली आणि तिला Ph D पदवीने सन्मानित केले गेले. आता ती डॉ भारती बापट  झाली होती.

पारल्यातील निवासी संकुलातील सवंगड्यांसह बाळपणीचे लगोरी-लपंडाव असोत, परदेशी स्थायीक झाल्यानंतर तिथल्या समाजातील जगभरातून आलेले परिचित – अपरिचित नागरिक असोत, सण-समारंभ असोत, रोज नव्याने दिसणारा पण रंग बदलणारा तोच निसर्ग असो, नव्या पाककृती आणि नव्या आहार संस्कृतीतील रसना कौशल्य असो, देशविदेशातील नव्या ठिकाणांना भेटी असोत .. ..अशा प्रत्येक अनुभवात आणि कार्यक्रमात मनापासून सहभागी व्हायचे आणि प्रत्येक ठिकाणी आनंदाची देवाण घेवाण करायची हा डॉ भारतीचा स्थायी भाव आहे.   

 सौ भारती आणि श्री विनीत बापट.

डॉ भारतीचे पती श्री विनीत बापट यांचा जन्म दक्षिणपूर्व आफ्रिकेतील मलावी या देशात झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या काळांत ते आफ्रिकेत स्थायीक झाले होते. श्री विनीत यांचे पूर्ण शिक्षण भारताबाहेर इंग्लिश माध्यमात झाले होते तरी मराठी लिहिण्याचा आणि बोलण्याचा त्यांना सराव आहे. भारती कॅनडात आल्यानंतर तिथल्या समाजाचा, स्थानिक संस्कृतीचा, परिधान, आहार, रसना संस्कृतीचा आणि हवामानाचा परिचय श्री विनीत यांनी करून दिला. आजही त्या सर्व आठवणींचे ती भरभरून कौतुक करते.

विवाहानंतर डॉ भारती न्यू ब्रुनस्वीक विभागातील मंक्टन या छोट्याशा गावात रहायला आली. या गावात काही भारतीय कुटुंब रहात होती. उत्साही भारती या समाजाच्या आनंदात सहभागी झाली आणि तिने नृत्य – नाट्य यावर आधारित अनेक भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कॅनडातील स्थायीक अन्य भारतीय नागरिकांच्या संस्थांकडून असे कार्यक्रम सादर करण्यासाठी तिच्या मंडळाला आमंत्रित केले जात असे. बघताबघता डॉ भारती, कॅनडियन समाजाची आणि यथावकाश आंतरराष्ट्रीय जेनेटिक आणि कर्करोग या विषयांत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ गटाची अग्रणी सदस्य झाली.

डॉ भारतीने प्रगत अभ्यासासाठी निवडलेल्या Reproductive Biology या ज्ञानशाखे संदर्भात काही उल्लेख करणे आवश्यक आहे. याच काळांत, मानव आणि अन्य सजीवांची  कृत्रिम गर्भधारणा याचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन, जगभरात सुरू झाले होते. अगदी प्राथमिक संशोधनात या प्रयोगासाठी प्राण्यांचा वापर केला गेला होता. इंग्लंडमधे In vitro fertilization म्हणजे Assisted reproductive Biology अर्थात कृत्रिम गर्भधारणेचे प्रयोग यशस्वी झाले होते. २५ जुलै, १९७८ या दिवशी लुईस जॉय ब्राऊन या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म इंग्लंडमधे झाला होता. मात्र विरोधाभास असा की अगदी याच काळांत भारतामध्ये हम दो हमारे दो या सरकारी धोरणानुसार, संततिनियमन आणि गर्भनिरोधक उपाययोजना करण्यासाठी प्रसिद्धी तंत्राचा वापर जनजागृती केली गेली होती. या सर्व जागतिक संशोधन पर्वाची आणि त्यातील स्थित्यंतराची, डॉ भारती साक्षीदार आहे आणि नंतरच्या काळांत ती यात सहभागी झाली आहे.

 

The Human Genome Project Logo

Ph D चा अभ्यास पूर्ण होऊन पदवी प्राप्त झाल्यानंतर, कॅनडातील नोव्हा स्कॉशिया येथील डलहौसी युनिव्हार्सिटी मधे बायोकेमिस्ट्री विभागात डॉ भारतीने Post Doctoral अभ्यासक्रम पूर्ण केला. The role of Anti-Estrogen Binding sites in the anti tumor drug Tamoxifen treatment हा तिच्या संशोधनाचा विषय होता. 

साधारण वर्ष १९८५ – ८६ मधे, श्री विनीत यांनी वेगळी नोकरी घेताली आणि डॉ भारतीसह ते कॅनडामधील टोरांटो शहरात, रहायला आले. इथे तिला Hospital for Sick Children या लहान मुलांच्या व्याधी आणि असाध्य रोगांवर उपचार करणाऱ्या जगप्रसिद्ध हॉस्पिटल मधे दुसरी Post Doctoral Fellowship करण्याची संधी मिळाली. Genetic आणि Metabolic या दोन विषयांत, Tay-sachs and Sandhoff या लहान मुलांत आढळणाऱ्या दोन अनुवंशिक रोगांवर संशोधन करणाऱ्या लॅबोरेटरी मधे तिचा अभ्यास सुरू झाला. कॅन्सर व्याधीचा प्रादुर्भाव करू शकणाऱ्या DNA Marker चे संशोधन आणि विश्लेषण हा या अभ्यासक्रमातील तिचा मुख्य विषय होता. याचवेळी कॅनडियन सरकारतर्फे Molecular Genetics या विषयांत Post Doctoral Training Fellowship Award यात तिला प्रवेश मिळाला. इथेच डॉ भारतीच्या Genetic Research आणि Cancer Research या दोन अभ्यासाच्या दोन विषयांची सांगड घातली गेली. पुढची दोन वर्षे Molecular Genetics Diagnostic Laboratory मध्ये तिने हा Training Programme पूर्ण केला. याच दरम्यान वर्ष १९८९ मधे त्यांची मुलगी चि कविताचा जन्म झाला. बाळंतपणातील ती चार – सहा महिन्यांची रजा संपल्यानंतर, तिने  उर्वरित Training Programme पूर्ण केला. या अभ्यासक्रमात तिला संशोधनासाठी स्वतःचा विषय निवडीचे स्वातंत्र्य होते. तिने Cancer Genetics हा विषय निवडला होता. हा Post Doctoral Fellowship Training Programme यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर, वर्ष १९९० पासून डॉ भारतीच्या संशोधन कार्याला निश्चित दिशा मिळाली.

हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर डॉ भारती, माऊंट साईनाय (Mount Sinai) या हॉस्पिटलमधे क्लिनिशियन सायंटिस्ट आणि लेक्चरर म्हणून दाखल झाली. इथे डॉ भारतीच्या संशोधनाचा विषय होता अनुवंशिक कोलोन कॅन्सर म्हणजे पोटाचा कर्करोग.  कॅनडासह पाश्चिमात्य देशांत या दुर्मिळ कर्करोगाचे रुग्ण आहेत. पालकांच्या DNA मधून अथवा धूम्रपानाचे व्यसन आणि कुपोषण अशा कारणानेही पोटाचा कर्करोग होऊ शकतो. या व्याधीवरील डॉ भारतीच्या संशोधनाचे महत्व असे की अशा अनुवंशिक व्याधीग्रस्त रुग्णाच्या अन्य नातेवाईकांचे Predictive Genetic or Diagnostic test या स्वरूपाची परीक्षा करून, एखाद्या व्यक्तीच्या अगदी दहाव्या आणि बाराव्या वर्षी, त्याच्या आरोग्याला भविष्यात होणाऱ्या व्याधीची कल्पना येऊ शकते. यामुळे Early Intervention स्वरूपाचे उपचार, या पोटाच्या कर्करोगाचा भविष्यातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी करता येतात. जगभरातिल या व्याधीने ग्रस्त रुग्णांची नोंद अनेक देशांत घेतली जात होती आणि या नोंदीची संघटित स्वरूपांत एका कॉन्सोर्टियमतर्फे  देवाण घेवाण सुरू झाली होती. या कॉन्सोर्टियमच्या माध्यमातून डॉ भारतीने आपले संशोधन रुग्णांना उपलब्ध करून दिले. या Molecular Genetics विषयातिल अनेक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात कॅनडा देशाचे प्रतिनिधित्व केले.

डॉ भारतीच्या कॅनडामधील संशोधन कार्यकाळात The Human Genome Project या जागतिक पातळीवरील संशोधन प्रकल्पाची सुरुवात वर्ष १९९० मधे झाली होती. National Institute of Health आणि United States Department of Energy या अमेरिकन सरकारच्या विभागातर्फे सुरू झालेल्या प्रकल्पात, अनेक देश सहभागी झाले होते. डॉ भारतीने या विषयातील अनेक चर्चासत्रात, कॅनडा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. वर्ष २००३ पर्यंत सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाची प्रगती – विकास – उपयोगिता – जगभरातील नामवंत संस्थांचा वाढता सहभाग,  याची डॉ भारती सहभागी साक्षीदार आहे. 

लेक्चरर – असिस्टंट प्रोफेसर – असोसिएट प्रोफेसर अशा चढत्या क्रमाने वर्ष २००७ मधे डॉ भारती टोरांटो युनिव्हार्सिटि मधे प्रोफेसर झाली. याकाळांत स्वतःच्या लॅबोरेटरीमधे या विषयांत अभ्यास करणारे विद्यार्थी स्वीकारायला सुरुवात केली.  हे सर्व विद्यार्थी Masters degree and Doctoral degree students, post-doctoral fellows, Medical resident trainees अशा पदवीप्राप्तीनंतर, डॉ भारतीच्या मार्गदर्शनाखाली,  प्रगत अभ्यास करणारे विद्यार्थी होते. डॉ भारतीच्या संशोधनाची सुरुवातीची साधरण पंधरा वर्षे, Cancer Genetics with special Focus on Inherited Colon Cancer या विषयावर केंद्रित झाली होती. या विषयांत डॉ भारती आता जागतिक स्तरावर अधिकारी संशोधक शास्त्रज्ञ म्हणून सर्वमान्य झाली होती. याचवेळी तिने माऊंट साईनाय हॉस्पिटल मधे, Genetic Testing Programme for Colon Cancer हा कर्करोग निदान करणारा कार्यक्रम निर्माण केला. याबद्दल डॉ भारती म्हणते Human Genome Project मधील माझ्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा फायदा सामान्य रुग्णापर्यन्त मला पोहोचवता आला, हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण होता.  

कॅन्सरचा प्रादुर्भाव होण्यासाठी, मानवी DNA मधील एपिजेनेटिक गुणसुत्रांचा प्रभाव निश्चित परिणाम करतो, याचा अभ्यास हे कॅन्सर संशोधनामधील नवीन क्षेत्र आहे. जागतिक संदर्भाने पाहिले तर या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या महिला शास्त्रज्ञ फार कमी आहेत. डॉ भारती या क्षेत्रातील अग्रणि महिला शास्त्रज्ञ म्हणून जागतिक पातळीवर कीर्तिमान झाली आहे. या बरोबरच कोलोन कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर या दोन व्याधींच्या संशोधनातील आघाडीची जेनेटिक रिसर्चर सायंटिस्ट म्हणून कॅनडा देशात ख्यातकीर्त आहे.

Prostate Cancer म्हणजे मूत्राशयचा कर्करोग ही पुरुष रुग्णांना होणारी एक व्याधी. याला अपायकारक असणाऱ्या जेनेटिक अथवा एपिजेनेटिक गुणसुत्रांवर  संशोधन झाले नव्हते. डॉ भारतीचे या विषयातील संशोधन, पथदर्शक स्वरूपाचे आहे. तिच्या अभ्यासानुसार या व्याधीने ग्रस्त रुग्ण दोन प्रकारचे असतात. खूप गंभीर पातळीवरील ग्रस्त रुग्णांना केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया अशा तितक्याच आक्रमाक उपचारांची आवश्यकता असते. प्राथमिक स्वरूपाच्या व्याधीग्रस्त रुग्णांना दर सहा महिन्यांनी उपचारांची आवश्यकता असते. डॉ भारती आणि तिच्या सहकऱ्यांच्या, पुरुष रुग्णांच्या मूत्रातील बायोमार्करच्या संशोधनानुसार,  मूत्राशयच्या  कर्करोगाचे  निदान करता येते. रुग्णाच्या मूत्राच्या डॉ भारतीने केलेल्या जेनेटिक विश्लेषणावरून रुग्णांचा डॉक्टर आता त्याच्या आजाराच्या गांभीर्याचे नेमके निदान करू शकतो आणि आवश्यक ती उपाय योजना सुचवू शकतो. या मानवी DNA मधील गुणसुत्रांचा बिघाड का होतो आणि त्याचा प्रभाव किती असतो यांचा अभ्यास म्हणजे Epigenetic चे संशोधन. मूत्राशयचा कर्करोग यावर योग्य उपाय करण्यासाठी डॉ भारतीने केलेले Epigenetic चे प्राथमिक संशोधन, तिच्या कारकीर्दीचा कळसाध्याय आहे.   

पुरुषांचा मूत्राशयाचा कर्करोग – अंडकोषाचा कर्करोग  या संदर्भात पुरुषांमध्ये जागृती करणारी Movember ही नवी दिशा देणारी संघटित चळवळ, वर्ष २००३ मधे ऑस्ट्रेलियात सुरू झाली. पुरूषांचे आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य आणि आनंदी जीवन यासाठी ही चळवळ जागतिक स्तरावर निधी उभारणीचे काम करते. यातूनच या कर्करोग ग्रस्त रुग्णांवर उपचार केले जातात. ऑस्ट्रेलिया – कॅनडा – अमेरिका – युरोप अशा सर्व देशांत ही चळवळ वेगाने विकसित झाली. दर वर्षी नोव्हेंबर माहिन्यात यांचे निधी उभारणी कार्यक्रम जगभर होतात. पुरुषांच्या मिशीचा म्हणजे Moustache चा M लावला म्हणून याला Movember Movement म्हटले गेले आहे. सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या डॉ भारतीने,  दीर्घकाळ या चळवळीची आणि याच विषयांत काम करणाऱ्या Prostate Cancer, Canada या संघटनेची प्रवक्ता आणि विशेषज्ञ म्हणून मोठे योगदान दिले आहे. 

 

विद्यार्थ्यांसह मध्यभागी पांढऱ्या जॅकेटमधे डॉ भारती बापट

नंतरच्या काळांत झालेल्या प्रगतीमधे, डॉ भारतीच्या मार्गदर्शनाखाली लॅबोरेटरीतिल तिचे सहकारी Genome Profiling चा अभ्यास करतात. यासाठी DNA Genetic Marker चे ऑपरेशन झालेल्या रुग्णाच्या गुणसुत्रांचा परिचय करून घेऊन त्यांचे विश्लेषण करतात. या संशोधनातून रुग्णाच्या गुणसुत्रांत होणारे जैविक – आण्विक स्वरूपाचे सूक्ष्म बदल आणि होणारे विविध फरक यांचे विश्लेषण आणि नोंद केली जाते. या विश्लेषण आणि नोंदीचा फायदा, जगभरातील कॅन्सर व्याधीग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी होतो. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह अन्य देशांच्या सहभाग आणि सहकऱ्याने हे संशोधन होत असल्याने, डॉ भारतीचे हे संशोधन वैश्विक पातळीवर पोहोचले आहे. डॉ भारतीच्या लॅबोरेटरीचे नांव BAPAT Laboratory असे आहे. याचा प्रत्येक भारतीयाला निश्चित अभिमान आहे. इथे शिकलेले अनेक विद्यार्थी,  विशेषतः विद्यार्थिनी,  आज या संशोधन क्षेत्रांत महत्वाचे योगदान देत आहेत. डॉ भारतीच्या लॅबोरेटरी मधे तिच्या मार्गदर्शनाखाली, अनेक संशोधन उपक्रम यशस्वी झाले आणि नवीन शोध लावले गेले. यासर्व संशोधन उपक्रम आणि त्यातील शोध या संदर्भात तिच्या रिसर्च टीमने, आजपर्यन्त १८० सायंटिफिक आर्टिकल आणि पेपर प्रकाशित केले आहेत.   

डॉ भारतीचा आणि तिच्या संशोधन कार्याचा विस्ताराने परिचय करून देणारा हा लेख प्रकाशित होईल तोपर्यंत नोव्हेंबर २०२१ मधे तिने निवृत्ती स्वीकारली असेल. सॅम्युअल लुनफील्ड रीसर्च इंस्टीट्यूट या संस्थेशी डॉ भारती संलग्न आहे. याच इन्स्टिट्यूटच्या लॅबोरेटरीत, गेली ३० वर्षे तिचे संशोधन संपन्न झाले आहे. या इन्स्टिट्यूटने तिच्या दीर्घकालीन यशस्वी संशोधन कार्याची विशेष नोंद घेताना, डॉ भारतीला Scientist Emeritus हा सर्वोच्च सन्मान देऊन अलंकृत केले आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून टोरांटो युनिव्हार्सिटिमधे तिची दीर्घकालीन कारकीर्द कीर्तिमान झाली. Professor Emeritus हा सर्वोच्च किताब देऊन युनिव्हार्सिटीने तिच्या कारकीर्दीचा गौरव केला आहे. आम्हा पारलेकरांसह सर्व भारतीयांना, आमची पारलेकर भारती आपटे, अर्थात डॉ भारती बापट या शास्त्रज्ञ विदूषीचा खूप अभिमान आहे...!..निवृत्तीनंतर काय करायचे याची आखणी झालेलीच आहे. श्री विनीत बापट, सौ कवितासह सर्व आपटे आणि बापट कुटुंबीय यासह  डॉ भारतीला शतशत शुभेच्छा..!      

--००--

अरुण फडके 

३ डिसेंबर, २०२१  

विलेपारले, मुंबई.

लेखन आणि लेखक परिचय:

  • गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती आणि  Heritage Structure Rehabilitation & Restoration या व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचा विशेषज्ञ.
  • विलेपार्ल्यातील गेल्या ९० वर्षातील हौशी आणि बालनाट्य चळवळ, प्रायोगिक - व्यवसायिक नाट्य चळवळ याचा इतिहास आणि विलेपार्ल्यातील रंगकर्मी यांचा परीचय करून देणाऱ्या पुस्तकाचे संकलन-लेखन सुरु आहे.    
  • फ्रीमेसनरी (Freemasonry) या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक, एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बुक प्रकाशित. 
  • विस्मृतीत गेलेल्या मराठी म्हणी - वाक्प्रचार याचे अभ्यासक. पुस्तक लवकरच प्रकाशित होईल. 
  • सिंबॉल सिंबॉलिझम अॅलिगरी, अर्थात  रूपकशास्त्र – प्रतीकशास्त्र --  चिन्ह – चिन्हसंकेत - चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक. चिह्न निमित्त – निमित्त चिह्न या पुस्तकाचे लेखन पूर्ण. पुस्तक लवकरच प्रकाशित होईल. 
  • विलेपारल्यातील बलुतेदार, भाग १ आणि भाग २ अशी संकलित २४ लेखांची  दोन ईपुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • नव दुर्गा प्राचीन संकल्पना – रुपके आणि मातृदेवता- प्राचीन भारतीय संकल्पना आणि रुपके, ही स्त्री देवतांच्या प्रतीके आणि रुपके या अभ्यासावर आधारित दोन ईपुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • आता मी पारल्यात रहात नाही हे ईपुस्तक ११ डिसेंबर २०२१ या दिवशी प्रकाशित होईल.
  • रंग बरसे – अद्भुत रंगसंस्कृति हे रंग या विषयाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासावर आधारित ईपुस्तक, २५ डिसेंबर २०२१ या दिवशी प्रकाशित होईल.        

अरुण फडके

--००--